ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - मुस्लिमांच्या तोंडी तलाक प्रथेनं वातावरण ढवळून निघालं असतानाच 35 वर्षीय तारा खान हिला चौथा तलाक मिळण्याची भीती सतावते आहे. गेल्या 12 वर्षांत तारा हिचा तीन वेळा तलाक झाला आहे. आताचा तिचा चौथा निकाह झाला आहे. आपल्याला चौथा नवराही तलाक तर देणार नाही ना, या चिंतेनं या महिलेला ग्रासलं आहे. पीडित तारा म्हणाली, गेली 12 वर्षं माझ्यासाठी कोणत्याही वाईट स्वप्नांहून कमी नव्हेत. मात्र असं पुन्हा झाल्यास माझ्यासाठी कुठेच जागा उरणार नाही. तारा ही उच्चशिक्षित नाही. त्यांचा पहिला निकाह जाहीद खान या व्यक्तीशी झाला होता. निकाहाच्या 7 वर्षांनंतरही त्यांना मूल झालं नाही. त्यामुळे त्यांच्या पतीनं दुसरा निकाह केला आणि त्यांना तलाक दिला. नव-यानं तलाक दिल्यानंतर ती स्वतःच्या कुटुंबीयांच्या घरी राहू लागली. त्याच वेळी तिच्या नातेवाईकांनी पप्पू खान नावाच्या व्यक्तीसोबत ताराचा निकाह लावून दिला. मात्र त्यानंही तिला तलाक देऊन स्वतःच्या जीवनापासून दूर सारलं. तारा म्हणाली, पप्पू मला मारहाण करत होता. एक दिवस मी विरोध केला तेव्हा त्यानं अपशब्द उद्गारले आणि मला तलाक दिला. त्यामुळे माझा दुसरा निकाह तीन वर्षांतच संपुष्टात आला. दुस-या पतीनं तलाक दिल्यानंतर तारा स्वतःच्या मामांकडे वास्तव्यास गेली. त्यानंतर मामा आणि त्याच्या मुलानं ताराला समजावलं आणि ताराचं तिसरा निकाह लावून दिला. तिसरा नवरा सोनूशी निकाहाच्या चार महिन्यांनंतर ताराचा तलाक झाला. सोनूही ताराला खूप मारहाण करत होता. तो फारच हिंसक मनोवृत्तीचा होता. एकदा सोनूनं ताराला मामाच्या घरी नेलं आणि तीन तलाक देऊन टाकला. तीनदा तलाक झाल्यानंतर तारालाही पुन्हा निकाह करण्याची इच्छा नव्हती. मात्र त्यानंतर तिने कुटुंबीयांच्या खातर चौथा निकाह केला. ताराचा गेल्या जुलै महिन्यात शमशाद नावाच्या व्यक्तीसोबत निकाह झाला. तारा म्हणाली, माझ्यासोबत फार वाईट घटना घडल्या आहेत. मला शमशादही सोडणार नाही ना, यामुळे मी घाबरली आहे. माझ्या 5 भावांना वाटतं की मी कुटुंबीयांच्या बदनामीचं कारण आहे. आता ते मला स्वतःजवळ ठेवू इच्छित नाही. मला हा निकाह संपवायचा नाही. काहीही झालं तरी मला शमशादसोबतच राहायचं आहे. मात्र शमशादही माझ्या इतर नव-यांसारखाच आहे. गेल्या 12 वर्षांत मी खूप दुःख सोसलं आहे. आता दुःख सोसायची माझ्यात ताकद नाही. तारा आणि शमशादची सध्या बरेलीमध्ये काऊन्सिलिंग सुरू आहे. तारा म्हणते, गरज पडल्यास मी हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत घेऊन जाईन, माझ्या नव-यानं मला सोबत ठेवावं असं मला वाटतं.
अबब ! 12 वर्षात "या" महिलेचा तीनदा तलाक, चौथ्या तलाकची भीती
By admin | Published: May 03, 2017 3:20 PM