नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये काँग्रेससहभाजपा, आम आदमी पार्टी, बसपा आणि अनेक छोटे पक्ष आपलं नशीब आजमावत आहेत. एकूण 70 जागा असलेल्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च 2022 रोजी संपत आहे. उत्तराखंडची निवडणूक भाजपासाठी सर्वात आव्हानात्मक आहे. कारण येथे गेल्या दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. पण काँग्रेसला टक्कर देत भाजप सत्ता परिवर्तनाची परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करेल. याच दरम्यान आता उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला (BJP) धक्का बसणार आहे आणि काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो.
एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 26 ते 32, काँग्रेसला 32 ते 38, आपला 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तराखंडच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत झाली. भाजपाला 41 टक्के मतं मिळत आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेसला 39 टक्के आहे. याशिवाय 'आप'च्या खात्यात 9 टक्के आणि इतरांच्या खात्यात 11 टक्के मतं अपेक्षित आहेत.
एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
भाजपा - 26 ते 32 जागाकाँग्रेस - 32 ते 38 जागाआप - 0 ते 2 जागाअन्य - 3 ते 7 जागा
मतांची टक्केवारी - एबीपी सी वोटर एक्झिट पोल मार्च 2022
काँग्रेस - 39 टक्केभाजपा - 41 टक्केआप - 9 टक्केअन्य - 11 टक्के
उत्तराखंडमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 57 जागा जिंकल्या आणि प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन केले. तर काँग्रेसला केवळ 11 जागाच मिळाल्या होत्या. यानंतर त्रिवेंद्रसिंह रावत मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना चार वर्षांनी हटवून भाजपने सत्तेची धुरा तीरथसिंह रावत यांच्याकडे सोपवली. मात्र काही महिन्यांतच तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.