देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. अद्याप तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी देखील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रचारही सुरु केला आहे. यामुळे सर्व्हे करणाऱ्या संस्था, कंपन्यादेखील उत्तर प्रदेशात नेमकी कोणाची हवा, हे जाणून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. रोज सभा, बैठका होऊ लागल्या आहेत. गेल्या निवडणुकीत सपामध्ये यादवी झाल्याने त्याचा फायदा भाजपाला झाला होता. परंतू कालच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यादव पुन्हा एकत्र आले आहेत. यामुळे भाजपाला कडवी टक्कर द्यावी लागण्याची चिन्हे आहेत.
ABP News C-Voter ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील वारे फिरू लागल्याचे दिसत आहे. जनता यावेळीही मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथांनाच पाहू इच्छित आहेत. मात्र, त्यांची लोकप्रियता घटली आहे. गेल्या आठवड्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लोकप्रियचा वाढली आहे.
एबीपी न्यूज-सी वोटरने याआधीही सर्व्हे केला होता. 6 डिसेंबरच्या सर्व्हेनुसार 44 टक्के लोक योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री पाहू इच्छित आहेत. तर 15 डिसेंबरला हा आकडा 42 टक्क्यांवर आला आहे. दहा दिवसांत योगींची लोकप्रियता दोन टक्क्यांनी घसरली आहे. दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 34 टक्के लोकांना अखिलेश मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत आहे. 6 डिसेंबरला 31 टक्के लोकांना ते मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत होते.
माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची लोकप्रियता देखील घटली आहे. 15 डिसेंबरला झालेल्या सर्व्हेमध्ये 14 टक्के लोकांनी त्यांनी सीएमपदासाठी निवडले. तर 6 डिसेंबरला 16 टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंत म्हटले होते. मायावतींच्या लोकप्रियतेत घट झाली आहे.
योगींचे कामकाज कसे आहे?सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी योगींचे काम चांगले म्हटले. 20 टक्के लोकांनी सरासरी म्हटले, तर 37 टक्के लोकांनी असंतुष्ट असल्याचे म्हटले आहे.