नवी दिल्ली : सध्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यास स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाणार नाही, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेनुसार, भाजपाप्रणित एनडीएला 233 जागा मिळणार आहेत. तर यूपीएला 167 आणि इतरांना 143 जागा मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. यात भाजपाला एकूण 203 तर काँग्रेसला 109 जागा मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, दक्षिण भारतातील सर्व राज्य आणि ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये जनतेचा कल जाणून घेतला. यामध्ये देशातील 543 लोकसभा मतदार संघातीस जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. डिसेंबर 2018 च्या तिसऱ्या आठवड्यापासून ते जानेवारी 2019 च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा सर्व्हे करण्यात आला.
उत्तर प्रदेशात भाजपाची उडणार दाणादाण?बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाची दाणादाण उडण्याची शक्यता असून, राज्यातील 90 जागांपैकी भाजपाला केवळ 25 जागा मिळतील तर सपा-बसपा यांच्या आघाडीला 51 जागा मिळतील असा अंदाज एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय होणार?आता निवडणुका झाल्यास भाजपा आणि शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेने स्वतंत्र लढल्यास दोन्ही पक्षांना मिळून केवळ 20 जागा जिंकता येतील, असा अंदाज सी व्होटर सर्वेचा आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास त्यांना 28 जागा मिळतील, असे या सर्वेक्षणातून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 जागांसाठी निवडणूक झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे कमबॅक होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कौल...या राज्यांच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला होता. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. यापैकी एनडीएचा 46 जागांवर विजय होताना दिसतोय. तर यूपीएला 19 जागा मिळत आहेत. मध्य प्रदेशात एनडीएला 23 तर यूपीएला 06 जागा मिळणार आहेत. राजस्थानमध्ये एनडीएला 18 तर यूपीएला 07 आणि छत्तीसगडमध्ये एनडीएला 05 तर यूपीएला 06 जागा मिळणार आहेत.
गुजरातमधील कौल...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये एनडीएला चांगला फायदा होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. या सर्व्हेनुसार, एनडीएला 24 जागा मिळताना दिसत आहेत. तर यूपीएला दोन जागा मिळत आहेत.
बिहारमध्ये एनडीएचीच बाजी...एकीकडे उत्तर प्रदेशात भाजपाला जबर नुकसान होत असताना बिहारमध्ये मात्र एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. बिहारमधील 40 जागांपैकी एनडीएला 35 तर यूपीएला केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये एनडीएमध्ये भाजपा, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिसामधील चित्र...सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागांपैकी 34 जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळत असल्याचे चित्र आहे. तर भाजपाला सात आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठी रणनीती आखली तरी याठिकाणी तृणमूल काँग्रेसलाच बहुमत मिळणार आहे. तर ओडिसामध्ये एनडीएलाला चांगला फायदा होणार असल्याचे दिसते. आडिसामध्ये एकूण 21 पैकी एनडीएला 12, तर राज्यातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलला नऊ जागा मिळताना दिसत आहेत.
उत्तर भारत, दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारत...उत्तर भारतात एकूण 45 जागा आहेत. यामध्ये एनडीएला 26 तर यूपीएला 19 जागा मिळत आहेत. दक्षिण भारतात 129 जागांपैकी एनडीएला 12, यूपीएला 69 आणि इतर 46 जागा मिळतील असे दिसते. तर पूर्वोत्तर भारतात 25 जांगावर एनडीए 14, यूपीए 9 आणि दोन इतर पक्षांना मिळेल.
गोवा आणि पंजाब...गोव्यात दोन जागा आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपाला एक-एक मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पंजाबमध्ये काँग्रेस बाजी मारणार असल्याचे दिसते. पंजाबमध्ये 13 जागांपैकी एनडीएला फक्त एक आणि यूपीएला 12 जागा मिळणार असल्याचे दिसते.