नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शाहांनी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतल्यानं चांगलीच रंगत आली आहे. भाजपाच्या या दोन नेत्यांनी दिल्लीच्या राजकारणाच्या हवेची दिशाच बदलली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार, 61 टक्के लोकांना वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचा भाजपाला फायदा होणार आहे. परंतु निवडणुकीत आम आदमी पार्टी 42 ते 56 जागा जिंकू शकते, तर भाजपाला 10 ते 24 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. दिल्लीतला सत्तेचा वनवास भाजपाला काही संपुष्टात आणता येणार नाही. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार 62 टक्के लोकांनी शाहीन बागेत धरणे आंदोलन करणं चुकीचं असल्याचं नमूद केलं आहे. तर 83 टक्के लोकांच्या मते, शाहीन बागेतील आंदोलन हा राजकारणाचा एक भाग झाला आहे. तसेच 39 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार शाहीन बागेतल्या मुद्द्याचा भाजपाला फायदा होईल, तर 25 टक्के लोकांच्या मते, आम आदमी पार्टीला हे आंदोलन फायदेशीर ठरणार आहे. फक्त चार टक्के लोकांना या मुद्द्यावरून काँग्रेसला फायदा होत असल्याचं वाटत असल्याचं समोर आलं आहे.सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवडणूक रॅलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या रॅलींचा भाजपाला फायदा होऊ शकतो हे 53 टक्के लोकांना वाटतं, तर 29 टक्के लोकांना याचा फायदा होणार नाही, असं वाटत आहे. 11 टक्के लोकांना हे सर्व काही कठीण असल्याचं वाटत आहे.केजरीवालांवर वैयक्तिक हल्ल्यानं भाजपाला फायदा होणार नसल्याचं 48 टक्के लोकांना वाटत आहे. 72 टक्के लोक केजरीवालांना बाहेरचा समजत नाही, तर 21 टक्के लोकांना केजरीवाल बाहेरचे वाटतात. केजरीवालांवर वैयक्तिक हल्ला केल्यानं 24 टक्के लोकांना वाटतं भाजपाला काहीही नुकसान होणार नाही.
Delhi Election 2020 : "मोदी, शहांच्या सभांचा भाजपाला फायदा होणार; पण सत्तेचा वनवास कायम राहणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:41 PM