अंकुश जगताप, पिंपरीविधानसभा निवडणुकीमुळे एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला, तरी सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच नेत्यांना साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम शुभारंभ समारंभापासून नाईलाजास्तव दूरच राहावे लागणार आहे. परिणामी पुणे विभागातील कारखान्यांची धुराडी पुढाऱ्यांच्या गैरहजेरीतच पेटणार आहेत.साखर आयुक्तालयाकडून पुणे विभागामध्ये चालू हंगामात आजवर ५८ साखर कारखान्यांना गाळपास परवानगी मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील १७, साताऱ्यातील १२, तर सोलापूरमधील २९ साखर कारखान्यांचा त्यात समावेश आहे. बहुतेक कारखान्यांकडून दर हंगामात शक्यतो दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर प्रदीपन केले जाते. यानंतर काही दिवसांनी राज्यातील किंवा देश पातळीवरील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत उसाची मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. त्यानंतर खऱ्या अर्थाने साखर उत्पादन सुरू होते.कारखान्यांच्या कार्यक्रमांमधून कळत-नकळत राजकीय बाबींना बळ देण्याचा अनेक पुढारी प्रयत्न करतात. राजकीय आडाखे बळकट करतात. शेतकऱ्यांना आश्वासने देतात. मात्र, या वर्षी आचारसंहिता कायम असणार आहे. दरम्यानच्या काळातच बॉयलर प्रदीपन व मोळी टाकण्याच्या कार्यक्रमांचे नियोजन होत असल्याने सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांवरही राजकीय पुढाऱ्यांना उपस्थितीच्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे.
पुढा-यांच्या अनुपस्थितीत धुराडी पेटणार!
By admin | Published: September 24, 2014 4:30 AM