हैदराबाद, दि. 10 - फळ्यावरील शब्द वाचता न आल्याने दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे. या विद्यार्थ्याच्या पाठीवर माराचे व्रण उठले आहेत. या प्रकरणी प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश सिंग असे या मुख्याध्यापकाचे नाव असून मुलाच्या पालकांनी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अद्यापपर्यत या मुख्याध्यापकास अटक करण्यात न आल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तपाचबुतरा येथील गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी नेहमीप्रमाणेच दुसरीचा वर्ग भरला होता. मुख्याध्यापक सुरेश सिंग यांनी फळ्यावर काही शब्द लिहिले व मुलांना वाचण्यास सांगितले. अनेक मुलांनी शब्द वाचले. पण एका मुलास शब्द वाचता येत नसल्याने मुख्याध्यापकांनी त्याला दरडावण्यास सुरुवात केली. यामुळे अधिकच घाबरलेल्या मुलाने आपण वाचू शकत नसल्याचे मुख्याध्यपकांना सांगितले.
मुलाचे बोलणे ऐकून संतापलेल्या मुख्याध्यापकांनी मागचा पुढचा विचार न करता त्याच्या पाठीवर वेताच्या छडीने मारण्यास सुरुवात केली. वेदनेने मुलगा कळवळू लागला व गयावया करू लागला. पण बेभान झालेल्या सिंग यांनी त्याला मारणे सुरूच ठेवले. मुलगा अर्धमेला झाल्यानंतर सिंग वर्गाबाहेर निघून गेले. शाळा सुटल्यानंतर मुलाने झालेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी त्वरीत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या नराधम मुख्याध्यापकावर भारतीय दंड विधानाच्या कलम 341 आणि 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रद्युम्नची शाळेतच निर्घृण हत्या झाल्याने गुरुग्राम पेटले आहे. या घटनेनंतर हैदराबादमधील शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या दोन्ही घटनांमुळे शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.