ऑनलाइन लोकमतउज्जैन, दि. 23 - देशभरात ट्रिपल तलाकवरून वाद उफाळून आला असतानाच एका फॅमिली कोर्टानं एका महिलेला तिच्या पतीकडून देण्यात आलेल्या ट्रिपल तलाकला अवैध, प्रभावहीन आणि शून्य घोषित केलं आहे. पतीनं तलाक देताना मुस्लिम धार्मिक ग्रंथांच्या प्रक्रियेचं पालन न केल्याचा ठपका कोर्टानं ठेवला आहे. त्यामुळेच न्यायालयानं हा तलाक अवैध ठरवला आहे, अशी माहिती पीडितेच्या वकिलांनी दिली आहे. उज्जैन फॅमिली कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश ओमप्रकाश शर्मा यांनी हा तलाक अवैध असल्याचं घोषित केलं आहे. तौसिफ शेखकडून अर्शी खानला ऑक्टोबर 2014ला देण्यात आलेला तलाक हा अवैध, प्रभावहीन आणि शून्य असल्याचं न्यायालय सुनावणीत म्हणाले आहे. उज्जैनमध्ये राहणा-या अर्शी आणि देवासच्या तौसिफ यांचा निकाह 19 जानेवारी 2013 रोजी झाला होता. निकाहच्या काही दिवसांनी तो पत्नीकडून हुंड्याची मागणी करू लागला. जेव्हा त्याची मागणी फेटाळण्यात आली, त्यावेळी तो अर्शीला मानसिकरीत्या त्रास देऊ लागला. त्यानंतर पीडित पत्नी पतीचं घर सोडून उज्जैनमध्ये तिच्या माहेरी राहण्यास आली. त्यानंतर तिने पतीविरोधात हुंडाबळी कायद्यांतर्गत खटला भरला. तो खटला आजही कोर्टात सुरू आहे. त्यानंतर तौसिफ यानं ऑक्टोबर 2014मध्ये मुस्लिम समाजातील प्रथेनुसार देवासमध्ये तीन जणांच्या समोर पीडित महिलेच्या अनुपस्थितीत तिला तलाक दिला. त्यानंतर त्या पीडितेनं कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानं पीडित पत्नीला नोटीस देत सांगितलं की, ट्रिपल तलाक बोलून तलाक दिला आहे. त्यानंतर पीडितेच्या वकिलानं पतीच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान दिलं. त्यात पीडितेच्या वकिलानं तलाक देताना मुस्लिम धार्मिक ग्रंथांमध्ये दिलेल्या प्रक्रियेचं पालन केलं नसल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं हा तलाक अवैध म्हणून घोषित केला आहे.
पत्नीच्या अनुपस्थितीत दिलेल्या तलाकला कोर्टानं ठरवलं अवैध
By admin | Published: April 23, 2017 9:17 PM