ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - आम आदमी पक्षाच्या कार्यकर्तीने केलेल्या आरोपांसदर्भात महिला आयोगाने समन्स बजावूनही कुमार विश्वास आयोगासमोर अनुपस्थित राहिले. आयोगाकडून अद्याप नोटीस न मिळाल्याने आपण महिला आयोगासमोर हजर राहणार नसल्याचे विश्वास यांनी सांगितले होते.
पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने पक्षनेते कुमार विश्वास यांना आरोपीच्या पिंजऱ्यात खेचले आहे. कुमार यांनी त्यांच्या सोबत अनैतिक संबंधांबाबत पसरलेल्या खोट्या अफवा फेटाळल्या नसल्याने आपली प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या महिला कार्यकर्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली महिला आयोगाने विश्वास आणि त्यांच्या पत्नीला पाचारण केले होते.
या मुद्यावरून काँग्रेस व भाजपनेआपविरुद्ध हल्लाबोल सुरू केला असतानाच पक्ष मात्र विश्वास यांच्या बाजूने उभा असून, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी पोलिसांवर टाकली. यावर पोलिसांनीही गुन्हा नोंदविण्यात आला असून चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना स्वतंत्र पत्राद्वारे यासंदर्भात माहिती दिली होती; परंतु दोघांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही, असा दावा या महिलेने केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तिने अमेठीत विश्वास यांच्यासाठी निवडणूक प्रचार केला होता. त्यानंतर विश्वास यांचे या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप झाला होता; परंतु विश्वास यांनी या आरोपांचे खंडन न केल्याने आपली प्रचंड बदनामी झाली असून खासगी आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी व्यथा तिने मांडली आहे.