- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीमोदी सरकारच्या बहुचर्चित अटल पेन्शन योजनेला वर्षभरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गतवर्षी ९ मे रोजी लागू केलेल्या या योजनेत वर्षभरात २ कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य ठरवले. प्रत्यक्षात १६ जानेवारी १६ पर्यंत केवळ १८ लाख ९९ हजार लोकांनीच या योजनेत भाग घेतला आहे. ज्या वर्गासाठी ही योजना लागू करण्यात आली, त्यात एकतर जागरूकतेचा अभाव तसेच पेंशनच्या रकमेसाठी दीर्घकाळाचा ‘लॉक इन पीरिएड’ असल्याने अनेक वर्षे आपली रक्कम अडकून राहू नये, म्हणून लोकांमध्ये फारसा उत्साह नाही.ज्यांचे वय १८ ते ४0 वर्षे आहे असे तरुण खातेदार अटल पेंशन योजनेसाठी मुख्यत्वे पात्र आहेत. सदर योजनेत दरमहा ४२ रुपयांपासून १४५२ रुपयांची रक्कम या खातेदारांनी गुंतवली, तर वयाच्या ६0 व्या वर्षानंतर त्यांच्या खात्यात जमा रकमेनुसार दरमहा १ हजार ते ५ हजार रुपयांची रक्कम दरमहा पेंशनच्या स्वरूपात त्यांना मिळणार आहे. पहिल्या ५ वर्षांपर्यंत प्रीमियमच्या निम्म्या रकमेची (अधिकतम १ हजार) पर्यंत सरकारतर्फे सबसिडीही दिली जाते. जितकी अधिक रक्कम खातेदार या योजनेत गुंतवील, तितक्या अधिक रकमेच्या पेंशनला तो पात्र ठरेल, अशी ही योजना आहे.यातील महत्त्वाची त्रुटी अशी की, वयाच्या २0 व्या वर्षी एखाद्या तरुणाने योजनेत खाते उघडले, तर वयाची ६0 वर्षे पूर्ण होईपर्यंत गुंतवलेल्या रकमेतला एक पैसाही त्याला काढता येणार नाही. थोडक्यात, रक्कम अडकून रहाण्याचा ‘लॉक इन पीरिएड’ तब्बल ४0 ते ४२ वर्षांचा आहे. हे लक्षात घेऊन सरकार काही नियम शिथिल करण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले.विशेष मोहीमही फसलीअटल पेंशन योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यत्वे पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीकडे (पीएफआरडीए) सोपवण्यात आली आहे. अधिकाधिक संख्येत तरुणांनी खाती उघडावीत, यासाठी अॅथॉरिटीने २९ व ३0 डिसेंबर १५असे दोन दिवस खास ‘लॉग इन डे’ जाहीर केले.तमाम बँकांनी या दोन दिवशी बाकीची कामे बाजूला ठेवून, फक्त अटल पेंशन योजनेची खाती उघडावीत, असे अॅथॉरिटीतर्फे सूचित करण्यात आले, तरीही सदर योजनेला नियोजित लक्ष्य गाठता आले नाही. अवघा ९.४९ टक्केच प्रतिसाद मिळाला.
अटल पेंशन योजना फ्लॉप!
By admin | Published: January 28, 2016 1:54 AM