नवी दिल्ली - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरुन काँग्रेस-भाजपामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधीवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी राजीव गांधी यांच्या हत्येला भाजपा जबाबदार असल्याचं विधान करत भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. तत्कालीन सरकारने राजीव गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार दिला होता त्या सरकारला भाजपाने पाठिंबा दिल्याची आठवण अहमद पटेल यांनी केली आहे.
राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी केंद्रात डीएमके सरकार होतं. त्या सरकारला भाजपाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसने थेट राजीव गांधी यांच्या हत्येसाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचे आयुष्य भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपलं अशी टीका जाहीर सभेत केली होती त्यानंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या.
काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, शहीद पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करणं म्हणजे हे भाजपा कमकुवत झाल्याचं लक्षण आहे. मात्र त्यांच्या हत्येला जबाबदार कोण? भाजपा समर्थित वी.पी.सिंह सरकार त्यावेळी सत्तेत होतं. राजीव गांधी यांच्या जीवाला धोका असूनही त्या सरकारने त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार दिला होता. गुप्तचर खात्याने राजीव गांधी यांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती सरकारला दिली होती पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज राजीव गांधी त्यांच्या तिरस्कारामुळे हयात नाही आणि त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ते आपल्यामध्ये नाही म्हणून त्यांच्यावर आरोप लावले जात आहेत असा आरोप अहमद पटेल यांनी केला.
बुधवारीही रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. यामध्ये बोलताना मोदी यांनी राजीव गांधी यांना पुन्हा लक्ष्य केले. जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता.