काल रात्री उशीरा दिल्लीत जेएनयु विद्यापीठात दोन गटात वाद झाल्याचे समोर आले आहे. दोन गटात जोरदार हाणामारी सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जेएनयूमधील भाषा विभागात निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून गुरुवारी रात्री दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमधील हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, विद्यार्थ्यांच्या वादात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती काही विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर सायकल फेकताना दिसत आहे. अजुन काही व्हिडीओ समोर आले आहेत. विद्यापीठ सुरक्षा कर्मचारी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? लोकसभेच्या उमेदवारांसाठी भाजप हायकमांडची ६ तास बैठक
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. या घटनेवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आमच्याकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तक्रारींची चौकशी करत आहोत. तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
जेएनयूमध्ये विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात १० फेब्रुवारीलाही जेएनयू कॅम्पमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ABVP आणि डाव्या गटात संघर्ष झाला होता. यामध्ये दोन्ही गटांचे विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा केला आहे.
JNU मध्ये २०२४ च्या JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी साबरमती धाब्यावर युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग बोलावण्यात आली होती, यावेळी हा वाद झाला. ABVP सदस्यांनी मंचावर चढून कौन्सिल सदस्य आणि वक्त्यांना मारहाण केल्याचा आरोप डाव्या-संलग्न डीएसएफने केला.