नवी दिल्ली, दि. 5- नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा प्रवास विद्यार्थी नेता, आमदार, खासदार, भाजपाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री ते आता उपराष्ट्रपती असा झालेला आहे. 68 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तेलुगू, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये भारतभर भाषणे देऊन उत्तम वक्ता म्हणूनही नाव कमावेलेले आहे.
व्यंकय्या नायडू यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील चवतपालेम येथे झाला. नेल्लोरमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी विशाखापट्टणम येथे विधी शाखेतील पदवी घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले, त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला आणि विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्ध झाले.विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्षही बनले.
1972 साली झालेल्या जय आंध्रा चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. 1974 साली जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते छात्र संघर्ष समितीचे काम करु लागले. जेपींच्या संपर्कात आल्यानंतर नायडू यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. हाच काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला गेला. त्यानंतर 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीविरोधातही नायडू सक्रीय राहिले. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारागृहातही जावे लागले.
1978 आणि 1983 अशा दोन टर्म्स ते आंध्र प्रदेश विधानसभेत उदयगिरी मतदारसंघातून निवडून गेले. याच काळामध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्येही विविध पदांवरती काम करत होते. कार्यकर्त्यापासून सुरुवात झालेली त्यांची पक्षांतर्गत कारकिर्द चांगलीच समृद्ध होत गेली. आंध्र प्रदेश भाजपाचे सरचिटणिस, प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 1980-85 या पाच वर्षांमध्ये ते आंध्र विधानसभेत भाजपाचे गटनेतेही होते. 1998 साली त्यांना पक्षाने कर्नाटकातून राज्यसभेवर पाठवले, ते सलग तीन टर्म्स राज्यसभेत कर्नाटकमधून नियुक्त होत गेले. 2016 साली राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवक्ता, राष्ट्रीय सरचिटणीस या पदांवरतीही काम केले. 2002 ते 2004 या कालावधीमध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमले गेले. जनकृष्णमुर्ती, बंगारु लक्ष्मण यांच्या नंतर भाजपाच्या अध्यक्षस्थानी बसणारे आणि दक्षिणेतून येणारे ते तिसरे व्यक्ती बनले.
केंद्रीय मंत्रिमंडळामध्येही चमकदार कामगिरीअटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये व्यंकय्या नायडू यांनी ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. रालोआ सरकारची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कल्पना त्यांनीच मांडली होती. रालोआचे दुसरे सरकार 2014 साली सत्तेमध्ये आल्यावर त्यांच्याकडे नागरी विकास आणि गृहनिर्माण आणि संसदीय कामकाज मंत्रायलयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2016 साली माहिती आणि प्रसारण खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले.