नवी दिल्ली :
दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री जेवणाच्या मेन्यूवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात काही विद्यार्थी जखमी झाले. यात दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले. या प्रकरणी जेएनयूच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, तर पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
जवळपास दोन वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती. रविवारी रात्री पहिल्यांदा पूजा करण्यावरून अभाविप व डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली.
रामनवमीनिमित्त कावेरी वसतिगृहात पूजा व हवन आयोजित केला होता. यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला. परंतु, वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांना शांत केल्यानंतर हवन शांतपणे पार पडले.
भोजनावेळी हा वाद पुन्हा उफाळून आला. भोजनामध्ये मांसाहारी पदार्थ होते. यावर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. रामनवमीच्या दिवशी मांसाहार कसा झाला, यावरून दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काही विद्यार्थी जखमी झाले. यासाठी डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी जबाबदार असल्याचा आरोप जेएनयूच्या अभाविपचे सचिव उमेश अजमेरा यांनी केला आहे. या आरोपांचा डीएसएफ या संघटनेने इन्कार केला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या घेऊन हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांना चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
कुलसचिव काय म्हणाले...- या घटनेवर जेएनयूचे कुलसचिव प्रो. रविकेश यांनी निवेदन प्रसिद्ध करून जेएनयूची बाजू मांडली आहे. जेएनयूच्या मेसचे संचालन विद्यार्थी समितीकडून होते.- त्यामुळे भोजनामध्ये कोणते पदार्थ शिजवायचे, हा त्यांचा प्रश्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जेएनयूला मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे. - हा वारशाचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. यात बाहेरच्या शक्तींनी हस्तक्षेप करू नये, असेही या निवेदनात म्हटले आहे.