हैदराबाद : बीबीसीच्या डॉक्युमेट्रीवरुन (BBC Documentry) उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या अनेक विद्यापीठांमध्ये मोठा राडा होत आहे. जेएनयू आणि जामियानंतर आता हैदराबाद विद्यापीठात गुरुवारी ही डॉक्युमेंट्री दाखवण्यावरुन बराच गदारोळ झाला. येथे SFI आणि ABVP चे कार्यकर्तेय एकमेकांना भिडले. एसएफआयने बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते, तर एबीव्हीपीने 'द काश्मीर फाइल्स' फिल्म दाखवली. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.
बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत हैदराबाद विद्यापीठात एसएफआय आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या डॉक्युमेंट्रीचे स्क्रिनिंग एसएफआयने आयोजित केले होते. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला. यापूर्वी 21 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने प्रशासनाच्या परवानगीशिवाय हैदराबाद विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी अहवाल मागवला होता. विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना कोणताही चित्रपट न दाखवण्याचा सल्ला दिला होता.
SFI चा दावा - 400 विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्री पाहिली
केंद्राने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीला अपप्रचार म्हणत त्यावर बंदी घातली होती. असे असूनही, एसएफआयने गुरुवारी डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग आयोजित केले. SFI च्या म्हणण्यानुसार, हैदराबाद विद्यापीठात झालेल्या स्क्रीनिंगमध्ये 400 विद्यार्थी उपस्थित होते. एसएफआयने ट्विट केले की, या विद्यार्थ्यांनी ABVP आणि प्रशासनाच्या अशांतता निर्माण करण्याचा आणि स्क्रीनिंग थांबवण्याचा खोटा प्रचार आणि प्रयत्न हाणून पाडले. दुसरीकडे, अभाविपने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग केले. हा चित्रपट काश्मीरमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित आहे.