हैदराबाद : तेलंगणमधील तीन तरुण यांत्रिकी अभियंत्यांनी सुरु केलेल्या स्टार्ट-अपला यश आले तर ज्यातून उन्हाळ्यात थंड व थंडीत उबदार हवेचा झोत डोक्यावर येईल असे दुचाकीस्वारांनी वापरायचे एसी हेल्मेट लवकरच बाजारात उपलब्ध होईल. कौस्तुभ कौंडिन्य, श्रीकांत कोम्मुला आणि आनंद कुमार या प्रत्येकी २२ वर्षांच्या अभियंत्यांनी यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याआधारे हेल्मेटचे उत्पादन करणारे ‘जर्श’ नावाचे स्टार्ट-अप सुरु केले आहे. हे तिघेही दोन वर्षांपूर्वी यांत्रिकी अभियांत्रिकीचे पदवीधर झाले. ‘जर्श’ हे ‘जस्ट ए रादर व्हेरी सेफ हेल्मेट’ या सविस्तर इंग्रजी नावाचे संक्षिप्त रूप असून त्याचा अर्थ अत्यंत सुरक्षित हेल्मेट असा होतो.कौस्तुभ कौंडिल्य या स्टार्ट-अपचा सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याने सांगितले की, या तंत्रज्ञानावर आधारित उन्हाळ््यात डोके थंड ठेवणारे व थंडीत डोके उबदार ठेवणारे औद्योगिक कारखान्यात वापरायचे हेल्मेट आम्ही विकसित केले असून आता तशाच प्रकारचे दुचाकीस्वारांना वापरता येईल, अशा हेल्मेटवर आम्ही काम करत आहोत. त्यांच्या या स्टार्ट-अपला तेलंगण सरकारचे पाठबळही लाभले आहे.या औद्योगिक हेल्मेटचे उत्पादन करण्यासाठी तेलंगणात मेडचाल येथे उभारण्यात येणाºया कारखान्यात मार्चअखेर उत्पादन सुरु होईल, असे कौस्तुभने सांगितले. दरमहा एक हजार हेल्नेट उत्पादनाची या कारखान्याची क्षमता असेल.अशा काही हेल्मेटची चाचणी व परीक्षणासाठी विक्री करण्यात आली असून भारतीय नौदलाने नौदल गोद्यांमधील कामगारांसाठी व टाटा मोटर्सने त्यांच्या लखनऊ कारखान्याती कामगारांसाठी अशी हेल्मेट घेतली आहेत, असेही कौस्तुभने सांगितले. अशी २० हेल्मेट एप्रिल महिन्यात हैदराबाद वाहतूक पोलीस शाखेस दिली जाणार आहेत. (वृत्तसंस्था)किंमत साडेपाच हजार-या हेल्मेटमधील हवेच्या तापमानाचे नियंत्रण करणारी यंत्रणा बॅटरीवर चालते. दोन तास चालणाºया बॅटरीच्या हेल्मेटची किंमत पाच हजार रुपये तर आठ तासाच्या बॅटरीच्या हेल्मेटची किंमत ५,५०० रुपये आहे.
लवकरच बाजारात येणार एसी हेल्मेट! तेलंगणच्या ३ तरुणांचे स्टार्ट अप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:38 PM