नवी दिल्ली- भारतात मोटारसायकलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक मोटारसायकल उत्पादक कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षितही करत असतात. उन्हाळा कडक असल्यानं ब-याचदा हेल्मेट घालूनच मोटारसायकल बाहेर रस्त्यावर काढावी लागते. हेल्मेटमध्ये उन्हाची झळ बसत नसली तरी बंदिस्त वातावरणात घामाघूम व्हायला होतं. परंतु तुमची हीच गरज ओळखून बंगळुरूस्थित एका कंपनीनं वातानुकूलित हेल्मेट बाजारात आणलं आहे.बंगळुरूमधल्या ब्लू आर्मर कंपनीनं हे हेल्मेट तयार केलं आहे. ब्लू स्नॅप नावाच्या हेल्मेटमध्ये कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. या हेल्मेटची किंमत 1609 रुपये इतकी असून, कमी बजेट असलेले मोटारसायकलस्वारही हे हेल्मेट खरेदी करू शकतात. सध्या दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात या हेल्मेटची विक्री सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत 44 ते 45 अंश सेल्सियस तापमान असल्यानं हे हेल्मेट बाइकस्वारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच ट्रॅफिकमध्ये या हेल्मेटमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु हे हेल्मेट सध्या ऑनलाइन उपलब्ध असून, अनेकांनी हेल्मेट खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे.या हेल्मेटमध्ये एअर कूलिंगची सिस्टीम देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे हेल्मेट तुम्हाला फक्त कूलिंगच देणार नाही, तर धुळीपासूनही तुमचं संरक्षण करणार आहे. त्यामुळे मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो सिटीमध्ये मोटारसायकलवरून फिरत असताना वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे हेल्मेट फायदेशीर ठरणार आहे. या हेल्मेटमधील एअर फिल्टर 3-6 महिन्यांनी बदलल्यास तुमचं प्रदूषणापासून संरक्षण होणार आहे. ब्लूस्नॅप हेल्मेटमधील कूलरमध्ये लिथियम बॅटरी देण्यात आली असून, ती यूएसबीच्या माध्यमातून चार्ज करता येते. सध्या तरी हे हेल्मेट बाइकस्वारांच्या पसंतीस उतरलं आहे.
उन्हाळ्यात मोटारसायकलवरून फिरा निवांत... एसी हेल्मेटने डोकं राहील कूssल !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 4:35 PM