कोलकाता - राजधानी दिल्लीत जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जगभरातील विविध देशांच्या प्रमुखांची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांसह सैन्य दलाच्या जवानांनाही दिल्लीला आणण्यात आले होते. त्यासाठी, कोलकातावरुनही सैन्य जवानांचे पथक आले होते. मात्र, दिल्लीहून कोलकाताकडे परत जाताना ह्या जवानांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. जवानांच्या कोचमधील एसी खराब झाल्यामुळे मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर उतरुन तीव्र संताप व्यक्त केला.
कोलकाता जाणाऱ्या ट्रेनमधील जवानांच्या कोचमध्ये एसी बंद पडला होता. त्यामुळे, या कोचमधून प्रवास करणाऱ्या सीआयएसफच्या सैनिकांना त्रास सहन करावा लागला. कोलकाताला जाणारी ही ट्रेन मुरादाबाद स्टेशनवर थांबली असता, जवानांनी खाली उतरुन गोंधळ सुरू केला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मुरादाबाद स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबली होती. त्यावेळी, कोचमधून ५० पेक्षा अधिक जवान खाली उतरले, जोरजोराने ते बोलतानाचे पाहून स्टेशनवर गर्दी जमा झाली होती.
जवानांच्या कोचमधील एसी बंद असल्याने २० जवानांची प्रकृती बिघडली होती. जवानांसाठीचा एसी-३ कोच हा दिल्लीतून काठगोदामला जाणाऱ्या ट्रेनला जोडण्यात आला होता, अशी माहितीही जवानांनी दिली. त्यामुळे, जवानांनी खाली उतरुन गोंधळ घातल्याने मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर ट्रेन अर्धा तास थांबली होती. जवानांचा डब्बा बाजुला करुन त्यातील एसी दुरूस्त करण्यात आला. त्यानंतर, कोलकाताला जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनशी जोडूनच जवानांना कोलकात्याला पाठवण्यात आले.
दरम्यान, सुरुवातीला कोणीही आमच्या समस्येकडे लक्ष दिले नाही. मात्र, मुरादाबाद स्टेशनवर गोंधळ घातल्यानंतर ही समस्या प्राधान्याने सोडवण्यात आली, असेही जवानांनी म्हटलं आहे.