राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग; मल्लीकार्जुन खरगे यांची 'आप'शी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 06:43 AM2022-06-12T06:43:24+5:302022-06-12T06:43:55+5:30
राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांच्या उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
नवी दिल्ली :
राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांच्या उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण राहील? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आप नेते खासदार संजय सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ते शनिवारला रात्री दिल्लीत पोहोचले. ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. आपचे राज्यसभेत आता ८ सदस्य आहेत. खरगे एनसीपी, टीएमसी, डीएमके, सपा, बसपाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
ममतांनी बाेलाविली बैठक
तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही १५ जून राेजी नवी दिल्ली येथे बैठक बाेलाविली आहे. सर्व विराेधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी बैठकीचे आमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व विराेधकांनी एकत्र येउन रणनिती आखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, हा त्यांचा एकतर्फी प्रयत्न उलटण्याचीच शक्यता जास्त असल्याचे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.
विरोधकांची एकी?
- राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून विरोधकांमध्ये एकमत होणार काय? याबद्दल अद्यापही ठोस काहीही सांगता येत नाही. विरोधकांची एकी हाेऊन
उमेदवारावरून एकमत व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु काँग्रेसच्या पुढाकारात आप, टीआरएस व टीएमसी पक्ष एकत्र येतील काय? हा मुख्य प्रश्न आहे.
- टीएमसीचे लोकसभेत २३ व राज्यसभेत १३ सदस्ये आहेत. टीआरएसचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत ७ सदस्य आहेत. यापूर्वी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या बोलाविलेल्या अनेक बैठकांना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावलेली नाही.