नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार गौतम गंभीरने आम आदमी पार्टीचे जनतेसमोर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरील यांना राजकारणात येवून 4.5 वर्षे झाली आहेत आणि मला फक्त 4.5 दिवस झाले आहेत. त्यांनी 4.5 वर्षांतील निम्मी वर्षे मला द्यावी, त्यानंतर मी त्यांच्यासोबत जनतेसमोर चर्चा करण्यासाठी तयार आहे, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
दिल्लीतील एका जनसभेला संबोधित करताना गौतम गंभीर म्हणाला, 'मला जनतेसमोर येऊन चर्चा करण्यास भीती वाटते, अशी माझ्या बाबतीत अफवा पसरवली जात आहे. मला पाकिस्तानची भीती नाही, तर चर्चा करण्याची काय असणार?' गौतम गंभीरने या सभेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून गौतम गंभीरने आम आदमी पार्टीला उद्देशून सांगितले की,' चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारतो, जागा तुमची, वेळ तुमची मात्र, सोशल मीडियावर नाही तर जनतेसमोर चर्चा करेन.'
दरम्यान, गौतम गंभीर याच्याकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. गौतम गंभीरच्या विरोधातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी मर्लेना यांनी न्यायालयात धाव घेत गौतम गंभीरकडे दोन मतदार ओळखपत्र असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली होती. तसेच, आतिशी मर्लेना यांनी पूर्व दिल्लीतील विकासाबाबत चर्चा करण्याचे खुले आव्हान गौतम गंभीरला दिले आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीर राजकीय मैदानात उतरला आहे. त्याला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पूर्व दिल्ली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. गौतम गंभीरची विचारधारा ही भाजपासारखीच आहे. जेव्हा गौतम गंभीर दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भूषवत होता. तेव्हा केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे दिल्लीच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून अरुण जेटली आणि गौतम गंभीर या दोघांचे चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळाले आहेत. गौतम गंभीर हा अरुण जेटली यांचा आवडता खेळाडू होता. त्याचबरोबर आता निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे.
जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल 'वॉर'!जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पीडीपी पक्षाच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली होती. मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला लागलेला 'डाग' असल्याची बोचरी टीका गंभीरने केली होती. यानंतर गौतम गंभीर आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली होती. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले.