नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी एका ट्वीटवरुन सरकारवर टीका केली. 'आता त्यांनी चीनने भारतीय भूमीवर ताबा मिळवल्याचे सत्यही स्वीकारले पाहिजे', असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधींचे ट्वीट
दरम्यान, भारत आणि चीनने गुरुवारी पूर्व लडाखमधून आणि इतर भागातून सैन्याच्या पूर्ण माघारीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर घेण्याचे मान्य केले आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार, सीमा प्रकरणांवर चर्चा आणि समन्वयासाठी(WMCC) कार्यप्रणालीच्या डिजिटल माध्यमातून झालेल्या बैठकीत, दोन्ही बाजूंनी वास्तविक रेषेवरील परिस्थितीबद्दल स्पष्ट आणि सखोल चर्चा केली. आता यावर पुढील बैठकीत चर्चा होईल.
शेतकऱ्यांनी गर्विष्ठांची मान झुकवली-राहुल गांधीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आणि आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन केलं. त्यानंतर राहुल गांधींनी ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिली. 'देशातील अन्नदाता शेतकऱ्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या. अन्यायविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा...' असे ट्वीट राहुल गांधींनी केले.