आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 03:33 PM2024-11-12T15:33:33+5:302024-11-12T15:34:39+5:30
जे पाकिस्तानला गेले ते महावीर झाले. आमच्या विरोधात दंगली झाल्या, आमच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, तरी आम्ही काही बोललो नाही, याचे कारण असे नाही की आमचे घर सुरक्षित होते, असेही अदीब म्हणाले.
वक्फ सुधारित विधेयकाविरोधात दिल्लीत विरोधी लोकांची एक बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये राज्यसभेचे माजी खासदार मोहम्मद अदीब सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आमचे उपकार माना, मोहम्मद अली जिना यांना मुस्लिमांनी नकार दिला नसता तर पाकिस्तानची सीमा लखनऊपर्यंत असली असती, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
मी गेली ५० वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. आज आम्ही आमच्याच भागात गुन्हेगारासारखे राहत आहोत. आता तर देशद्रोही देखील झालो आहोत. असे लोक पाहिलेत जे आमच्यासोबत रोज असायचे परंतू राजकीय करिअरसाठी ते आम्हाला आमच्या नशीबावर सोडून गेले आहेत. जे लोक पाकिस्तानला गेले त्यांच्यावरील दोष आम्हाला देण्यात आले, असे अदीब म्हणाले.
जे पाकिस्तानला गेले ते महावीर झाले. आम्ही तर आमचे रक्त वाटले होते. जिनांना आम्ही नकार दिला होता आणि ठोकरले होते. आम्ही लियाकत अली खानना मानले नाही तर आम्ही नेहरू, गांधी आणि आझाद यांना मानले होते. आम्ही जिनांसोबत गेलो नाही, हे उपकार सरकारने मानायला हवेत. असे झाले नसते तर पाकिस्तान लाहोरपर्यंत नाही तर लखनऊपर्यंत बनला असता, असे वक्तव्य अदीब यांनी केले आहे.
आमच्याकडे काहीही शिल्लक नाही. तुम्ही लोक आमची ताकद आहात. आम्ही अलिगडमध्ये शिकत होतो, तेव्हा राजकीय मंडळी म्हणायची की साहेब रागावतील. तुम्ही आम्हाला शिक्षा करताय आणि आमच्यावर अत्याचार करताय. आत्तापर्यंत आमच्यावर जेवढे हल्ले झाले त्यात सर्वात मोठा हल्ला आमच्या स्टेटसवर आहे. आमच्या विरोधात दंगली झाल्या, आमच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, तरी आम्ही काही बोललो नाही, याचे कारण असे नाही की आमचे घर सुरक्षित होते, असेही अदीब म्हणाले.