प्रार्थनास्थळांत प्रवेश; याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 05:57 AM2018-11-03T05:57:16+5:302018-11-03T05:57:40+5:30
कोणत्याही वयोगटाच्या व धर्माच्या महिलांना मंदिर, मशीद, अग्यारी आदी प्रार्थनास्थळांमध्ये मुक्त प्रवेश मिळावा यासाठी केलेली एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
नवी दिल्ली : कोणत्याही वयोगटाच्या व धर्माच्या महिलांना मंदिर, मशीद, अग्यारी आदी प्रार्थनास्थळांमध्ये मुक्त प्रवेश मिळावा यासाठी केलेली एक याचिका दिल्लीउच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
याचिकेचा विषय न्यायालयाच्या कक्षेबाहेरचा असल्याचे कारण देऊन मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन व न्या. व्ही. के. राव यांच्या खंडपीठाने ती फेटाळून लावली. याचिकेमध्ये नमूद केलेली कोणती मंदिरे दिल्ली उच्च न्यायालयाच्या कक्षेत येतात त्यांचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे या याचिकेची दखल घेण्याचे काहीही कारण नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. अॅड. संजीवकुमार यांनी याचिकेत म्हटले की, मंदिरामध्ये पुजारी, मशिदीमध्ये इमाम व चर्चमध्ये पाद्री म्हणून महिलांची नेमणूक झाली पाहिजे.
कृती घटनाबाह्य ठरवा
मासिक पाळीच्या काळात मुस्लिम महिलांनी उपवास तसेच प्रार्थना करण्यासाठी केलेली मनाई घटनाबाह्य आहे, असे जाहीर करावे. मासिक पाळीत हिंदू महिलांना स्वयंपाकघरात प्रवेश व उपवास करण्यासाठी, मंदिरात वा कुठेही जाण्यास अडथळा आणू नये म्हणून नियम बनविण्याचा केंद्राला आदेश द्यावा, असे याचिकेत म्हटले होते.