इटावा - उत्तर प्रदेशच्या इटावा जवळील आग्रा-लखनौ एक्सप्रेस महामार्गावर भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. कंटेनरने एका टुरिस्ट बसला धडक दिल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत. प्रवासी बस दिल्लीहून आग्र्याकडे जात असताना पहाटे 5.00 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातातील जखमींना उपाचारासाठी सैफई पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 50 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ते दोघे पती-पत्नी होते. विठ्ठल मारुती आणि सुलोचना अशी त्यांची नावे असून ते कर्नाटकमधून दिल्लीला पर्यटनासाठी आले होते. जखमींमध्ये सुमन, विनीता, सुशिला, सुरपाल कापडे, शांता बाबू, इंदुबाई, इटोवा सिन्धे, कंचन विजय कावळे, लक्ष्मी, बाबूराम बाबर, मृगदेव आणि संदीप वावर यांचा समावेश आहे.
अपघाताच्या घटनेची माहिती मिळतााच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एएससपी सत्यपालसिंह यांनी माहिती देताना म्हटले की, चौबिया पोलीस ठाणे परिक्षेत्रांतर्गत असलेल्या आग्रा-लखनौ महामार्गावर अपघाताची ही भीषण घटना घडली. दिल्लीहून आग्र्याकडे निघालेल्या बसला एका कंटेनरने पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढ्या जोराची होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. कंटेनरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायरला तोडून कंटेनर प्रवासी बसवर जाऊन आदळला. याप्रकरणी सध्या अपघाताच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून तपास सुरू आहे.