पाटणा - बिहारमधील सारण जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका भरधाव कारने सुमारे १८ जणांना चिरडले. या अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सारणमध्ये तेराव्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी या कार्यक्रमात भरधाव कार घुसली. या कारने तिथे भोजन करत असलेल्या १८ जणांना चिरडले. त्यानंतर घटनास्थळावर आरडाओरडा सुरू झाला. दरम्यान, टक्कर दिल्यानंतर ही कारही उलटली. या अपघातात अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली. तसेच घटनास्थळावर रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेमधून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आता पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.
या घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आधी भरधाव कारने एका दुकानाला धडक दिली. त्यांनंतर ही कार तेराव्याचं भोजन सुरू असलेल्या जेवणाच्या पंगतीमध्ये घुसली. हे एवढ्या वेगात घडलं की काही काळ काय झालं हे कळलंही नाही.