Bullet Train Project Site Accident: अहमदाबाद-मुंबई दरम्यान बांधल्या जात असलेल्या बुलेट ट्रेनच्या मार्गावर मोठा अपघात झाला. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी अहमदाबादच्या वटवाजवळ सेगमेंटल लॉन्चिंग गॅन्ट्री कोसळून मोठा अपघात झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही नसून कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकार मोठा परिमाण झाला आहे.
अहमदाबादच्या वटवाजवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सेगमेंटल लॉन्चिंग गॅन्ट्री निसटली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. काँक्रीट गर्डर टाकल्यानंतर गॅन्ट्री मागे घेतली जात असताना त्याचा तोल सुटला आणि हा अपघात घडला. या दुर्घटनेमुळे बुलेट ट्रेनच्या बांधकामाधीन मार्गाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र जवळपासच्या रेल्वे रुळांचे किरकोळ नुकसान झालं ज्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय.
या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने अपघात निवारण ट्रेन रवाना केली आणि नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातानंतर जवळपास २५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ५ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात असून ६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करता येईल. या कामासाठी क्रेनचाही वापर करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई सेंट्रल-गांधीनगर राजधानी वंदे भारत एक्सप्रेस (२०९०१) अंशतः रद्द करण्यात आली आहे. याशिवाय नडियाद-गांधीधाम दरम्यान ट्रेन क्रमांक २०९३६ इंदूर-गांधीधाम एक्स्प्रेस अंशतः रद्द करण्यात आली. ट्रेन क्रमांक १९३१० इंदूर-अहमदाबाद शांती एक्स्प्रेस रद्द करुन आनंद स्थानकावर थांबवण्यात आली. तर गाडी क्रमांक ०९४१२ ग्वाल्हेर-अहमदाबाद स्पेशल छायापुरी-अहमदाबाद दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली. ट्रेन क्रमांक १९१६६ दरभंगा-अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस ही महमुदाबाद खेडा रोड स्थानकापर्यंतच चालवण्यात आली.
अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने वटवा-बोरिवली एक्सप्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, वडोदरा-वटवा इंटरसिटी, अहमदाबाद-वलसाड गुजरात क्वीन, जामनगर-वडोदरा इंटरसिटी, वडनगर-वलसाड-वडनगर एक्सप्रेस, वाटवा-आनंद एक्सप्रेस यासह सुमारे २५ गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.