उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात (Banke Bihari Mandir) चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मंदिरात गर्दी खूप झाली होती अशी माहिती कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांनी दिली आहे. यामुळे आरती करताना 50 हून अधिक जण बेशुद्ध पडले. व्हीआयपींना एन्ट्री दिल्याने हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांनी या घटनेची माहिती दिली आहे. गर्दीमुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं. मृतांची ओळख पटली आहे. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये नोएडाच्या रहिवासी निर्मला देवी, वृंदावनचा रहिवासी राजकुमार यांचा समावेश आहे.
व्हीआयपींचा दर्जा दाखवून अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला, असा दावा मंदिराच्या सेवकांनी केला. इतर भाविक आधीच उपस्थित होते. व्हीआयपी भाविकांच्या आगमनाने संख्या वाढली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या आईला आणल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसेच मथुरा रिफायनरीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सात नातेवाईकांनी मंगला आरतीला हजेरी लावल्याचा दावा करण्यात आला आहे.
बांके बिहारी मंदिरातील सेवकांचे म्हणणे आहे की, अधिकाऱ्यांचे नातेवाईक गच्चीवर बांधलेल्या बाल्कनीतून दर्शन घेत होते. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वरच्या मजल्यावरचे दरवाजे अधिकाऱ्यांनी बंद केले. त्यामुळे लोकांना वाचवणे कठीण झाले. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय, पोलीस आणि जिल्हा न्यायालयातील अधिकारी कुटुंबीयांसह व्हीआयपी दर्शन करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही केला जात आहे. दुपारी दोन वाजता मंगला आरती सुरू होण्यापूर्वीच गर्दी वाढली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.