राजस्थानमधील नागौर येथील डेगाना येथे विश्वकर्मा जयंतीदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. एका अनियंत्रित बोलेरोने शोभायात्रेत घुसून दहा-बारा लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे आणि इतर जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना अजमेरला रेफर करण्यात आले आहे.
काही जखमींवर डेगाना येथे उपचार सुरू आहेत. बाजारात शोभायात्रा निघाली तेव्हा लहान मुलं आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. सर्वच जण आनंदाने सहभागी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर रुग्णालयात आता मोठी गर्दी झाली आहे. बोलेरो चालकाला हार्ट अटॅक आला, त्यानंतर त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बोलेरो लोकांना चिरडत पुढे निघून गेली.
भयंकर घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये बोलेरो कशी अचानक शोभायात्रेत घुसते आणि लोकांना चिरडून पुढे जाते हे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बोलेरो चालक सुरुवातीला शोभायात्रेच्या मागे हळूहळू चालत होता, मात्र अचानक बोलेरो गाडीचा वेग वाढतो.
गाडीचा वेग वाढल्याने ती लोकांना चिरडत पुढे सरकत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं बोलेरो चालकाला हार्ट अटॅक आला, त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि वाहनावरील नियंत्रण सुटलं. या दुर्घटनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर देखील लोकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.