मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. ही घटना शाहपुरा पोलिस ठाणे आणि बिचिया पोलिस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात झाला. पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात झाला. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कौटुंबिक कार्यक्रमावरुन परतत होते. जखमींना शाहपुरा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत दिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा म्हणाले, 'दिंडोरीतील बारझार घाटात पिकअप वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याने १४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर लिहिले आहे की, दिंडोरी जिल्ह्यातील एका वाहन अपघातात १४ जणांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.