मागच्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आज पहाटे रेल्वे अपघात झाला. येथे वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले. या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचं इंजिन आज पहाटे २.३५ च्या सुमारास कानपूरजवळ रेल्वे रुळांवर ठेवलेल्या कुठल्या तरी वस्तूवर आदळलं. त्यानंतर इंजिनासह डबे रुळांवरून घसरले. या घटनेनंतर काही खुणा दिसून आल्या. काही खुणा १६ व्या डब्याजवळ आढळल्या आहेत. प्राथमिक तपासामध्ये रेल्वेच्या रुळांना कुठलंही नुकसान झालेलं दिसून आलं नाही.
रेल्वेमंत्र्यांनी आपल्या एक्सवरील सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती देताना सांगितले की, या दुर्घटनेतील पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. आयबी आणि उत्तर प्रदेश पोलीस घटनेचा तपास करत आहेत. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांसाठी अहमदाबाद येथे जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, कानपूरचे एडीएम (सिटी) राकेश वर्मा यांनी सांगितले की, साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळांवरून उतरले. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाहीत. सर्व प्रवाशांना बसमधून स्टेशनवर पाठवण्यात येत आहे. तसेच एक मेमू गाडीही येथे येत आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेस दुर्घटनाग्रस्त झाली. येथे ट्रेनचे २२ डबे रुळावरून घसरले होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नव्हती. या अपघाताबाबत माहिती देताना ड्रायव्हरने सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या हा अपघात मोठा दगड इंजिनावर आदळल्याने झाल्याचे समोर येत आहे. कारण दगड इंजिनावर आदळून इंजिन वळल्याचं दिसत आहे.