हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील आज सकाळी एक भीषण अपघात झाला. येथील धर्मपूरमध्ये कालका-सिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव इनोव्हा कारने पादचाऱ्यांना चिरडले.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना पीजीआयमध्ये अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. तर अन्य दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार कालका-सिमला महामार्गावर धर्मपूर येथील ही घटना आहे. मंगळवारी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एक इनोव्हा भरधाव वेगाने सिमलाच्या दिशेने येत होती. यादरम्यान, वळणावर वाहनचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या कारने तिथून जात असलेल्या पादचाऱ्यांना चिरडले.
या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून दोन गंभीर जखमींना चंडीगड येथील पीजीआयमध्ये अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच मृत आणि जखमींची ओळख पटली आहे.
आज सकाळी सोलन येथील धर्मपूरमधील सुक्की जोहडी येथे काही लोक पायी जात होते. अपघाताची शिकार झालेले सर्व जण प्रवासी मजूर असून ते उत्तर प्रदेशमधील कुशीनगर आणि बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहेत. मृतांची ओळख गुड्डू यादव, राजा वर्मा, निप्पू निसाद आणि मोतीलाल यादव आणि सन्नी देवल अशी पटली आहे.