भारतात महामार्गांवर होणारे अपघात ही चिंतेची बाब बनलेली आहे. बऱ्याचदा चालकांचा निष्काळजीपणा, अतिवेग यामुळे भीषण अपघात होत असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कार हायवेवर दोन ट्रकदरम्यान सापडून तिचा चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढा भीषण अपघात झाल्यानंतरही कारमध्ये बसलेल्या ड्रायव्हरला साधं खरचटलं देखील नाही. मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर कारमध्ये बसलेला ड्रायव्हर कुठलीही दुखापत न होता स्वत:हून बाहेर आला.
हा अपघात गुजरातमधील राजकोट एक्स्प्रेस वेवर झाला. या अपघाताचे काही व्हि़डीओ समोर आले असून, त्यामध्ये एका कारने ट्रकला मागून धडक दिलेली दिसत आहे. तर दुसरा ट्रक मागून येऊन कारवर आदळला आहे. या अपघातामध्ये कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. सुदैवाने कारमधून केवळ एकच व्यक्ती प्रवास करत होती. मात्र कार चालवत असलेल्या या व्यक्तीला फारशी दुखापत झाली नाही. अपघात झालेली कार ही टाटा टियागो कंपनीची होती. टक्करीमुळे कार एका बाजूने चेपून गेली.
फोटोंमध्ये कारचा पुढचा भाग ट्रकच्या खाली गेला आहे. तर कारच्या मागच्या भागाचं धडकेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सुदैवाने कारच्या मागच्या सीटवर कुणी नव्हते. अन्यथा त्यांना जबर दुखापत झाली असती.