चेन्नई - तामिळनाडूमधील कोईंबतूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका यूपीएसचा स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोईंबतूरमधील रोज गार्डन परिसरात ही दुर्घटना घडली. त्याच आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला. आई विजयलक्ष्मी आणि त्यांच्या दोन मुली अर्चना आणि अंजली यांच्यासोबत त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.
विजयलक्ष्मी ह्या कोईंबतूर जिल्ह्यातील उरुमंडमपलयम रोज गार्डन परिसरामध्ये राहत होत्या. तिथे २४ वर्षांची अर्चना प्रोग्रॅमर म्हणून काम करत होती. तर २१ वर्षीय अंजली एका खासगी कंपनीमध्ये काम करत होती. दोघीही अविवाहित होत्या. या दुर्घटनेची माहिती शेजाऱ्यांनी सकाळी विजयलक्ष्मी यांच्या घरातून धूर येताना दिसला तेव्हा मिळाली. त्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.
अग्निशमन दलाने महत्प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि घराचा दरवाजा तोडला. तिथे किचनमध्ये आई आणि एका मुलीचा मृतदेह सापडला. तर दुसरी मुलगी बेडरूममध्ये मृतावस्थेत सापडली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोईंबतूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील हॉलमध्ये लावलेला एसी अचानक फुटला. त्यामुळे आग लागली. तसेच घरात धूकर पसरला. अंजली आणि विजयालक्ष्मी यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र त्या त्यात अपयशी ठरल्या असाव्यात आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की या दुर्घटनेत त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला.