बाराबंकी - उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे सकाळी सकाळीच भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. एका खासगी प्रवासी वाहतूक बस आणि ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाराबंकीच्या देवा पोलीस ठाणे परीक्षेत्रातील बबुरी गावाजवळ हा दुर्घटना घडली.
बस आणि ट्रक समोरासमोरुन वेगाने येत होते, त्याचवेळी अचानक एक म्हैस समोर आडवी आल्याने दोन्ही वाहनचालकांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे, दोन्ही गाड्यांची एकमेकांना धडक बसली. किसान पथ रिंग रोड येथे ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, प्रवासी बसमधील नागरिकांनी मोठ-मोठ्याने रडायला सुरुवात केली.
प्रवाशांना पर्यटनासाठी घेऊन बस दिल्लीहून बहराइच येथे जात होती. त्याचवेळी, समोरून आलेल्या ट्रकला जोराची धडक बसली. या प्रवासी बसमध्ये 70 प्रवाशी होते, तर ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यात येत होती. बस आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत 8 जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती बाराबंकीच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जखमींना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस व प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली आहे.