छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बालोद जिल्ह्यातील जगतारा जवळ झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील सदस्य होते, असे सांगण्यात येत आहेत. बालोद पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, बालोद जिल्ह्यातील जगतराजवळ ट्रक आणि कार यांच्यात टक्कर होऊन १० जणांचा मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. या जखमी मुलाला अधिक उपचारांसाठी रायपूर येथे पाठवण्यात आलं आहे. तर ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये स्वार झालेलं कुटुंब बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे-३० वरून बालोद येथील जगतरा येथे पोहोचले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या बोलेरोला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात ५ महिला, एक मुलगी आणि ४ पुरुषांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका जखमी मुलीला अधिक उपचारांसाठी रायपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. तसेच पोलिसांनी या अपघातासंदर्भात एफआयआरसुद्धा नोंदवली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, बालोदमधील पुरुर आणि चारमादरम्यान, बालोदगहनजवळ लग्नाच्या कार्यक्रमात जात असलेली बोलेरो आणि ट्रक यांच्यात भीषण धडक होऊन, १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो. तसेच कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. मी जखमी मुलीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.