अनेक वादांमध्ये अडकलेल्या आसाम पोलिसांच्या एका महिला उपनिरीक्षकाचा मंगळवारी पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला. नागाव जिल्ह्यातील सरुभुगिया गावात हा भीषण अपघात झाला. तिची खासगी कार कंटेनरवर आदळली.
जुनमोनी राभा असे पीएसआयचे नाव आहे. अपघाताच्या वेळी ती तिच्या खासगी कारमध्ये होती आणि तिने पोलिसांचा गणवेश घातला नव्हता. एवढ्या रात्री ती कुठे जात होती, हे तिच्या कुटंबीयांनाही माहिती नव्हते. जाखलबंधा पोलिस स्टेशनचे प्रभारी पवन कलिता यांनी सांगितले की, अपघाताची माहिती पहाटे 2.30 च्या सुमारास मिळाली, त्यानंतर पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले. राभा यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
उत्तर प्रदेशातून येणारा कंटेनर ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. नागावच्या पोलीस अधीक्षक लीना डोळे यांनी सकाळी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. साध्या वेशात महिला पोलीस अधिकारी तिच्या खाजगी कारमधून अप्पर आसाममध्ये का जात होती, हे पोलिसांनाही माहिती नाही.
गेल्या वर्षी जूनमध्ये तिला तिच्या माजी प्रियकरासह भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तिने तिच्या प्रियकराशी लग्न तोडले होते. माजुली जिल्ह्यातील एका न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर तिची सेवा निलंबित करण्यात आली होती. नंतर तिचे निलंबन मागे घेण्यात आले आणि ती पुन्हा पोलिस सेवेत रुजू झाली होती.
बिहपुरिया मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार अमिया कुमार भुईंया यांच्याशी फोनवरील तिचे बोलणे देखील लीक झाले होते. दोन दिवसांपूर्वीदेखील तिच्याविरोधात लखीमपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोणतेही कारण नसताना एका मुलाला मारहाण केली, काही कागदपत्रे आणि दागिन्यांसह 80,000 रुपये रोखही नेले आणि त्याला सोडण्यासाठी सहा लाख रुपये घेऊन येण्यास सांगितल्याचा आरोप यात मुलाच्या पित्याने केला होता.