अयोध्या - उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील खास चौक तेरा भाई त्यागीशी संबंधित रघुवंशी समाजाचे महंत कनक बिहारी दास यांचा सोमवारी अपघाती मृत्यू झाला. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ही दुर्घटना घडली. एका दुचाकीस्वाकाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार दुभाजकाला धडकली. गाडीचा वेग मोठा असल्याने गाडी दोनवेळा पलटी मारली, त्यामध्ये कनक बिहारी दास यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला. अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण झाल्यानंतर ते फेब्रुवारी महिन्यात नऊ हजार नऊ कुंडी यज्ञ करणार होते. मात्र, त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.
महंत कनक बिहारी दास यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला होता. श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या निर्देशानुसार विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सुरू केलेल्या निधी समर्पण अभियानात २५ जानेवारी २०२१ रोजी खाक चौक मंदिर तर्फे १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. खाक चौक मंदिराचे त्यागी संत कनक बिहारी दास यांनी राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे हा चेक सुपूर्द केला होता.
राम मंदिर उभारणीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा चेक दिल्यामुळे कनक बिहारी दास चर्चेत आले होते. मात्र, आता त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अयोध्येतील संत-महात्म्यांनाही दु:ख अनावर झालं आहे.
दरम्यान, महंत कनक बिहारी दास हे फेब्रुवारी २०२४ मध्ये मोठ्या उत्साहात ९००९ महाकुंड यज्ञ करण्याची तयारी करत होते. मात्र, या अकाली निधनामुळे त्यांची महायज्ञाची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे.