नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमाचा रिलीज करण्यात आलेला ट्रेलरवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये नवीन वाद रंगला आहे. गुरुवारी (27 डिसेंबर) 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. कथा आणि संवादांमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यावर आता राजकारणदेखील सुरू झाले आहे.
काँग्रेसनं या सिनेमावर तीव्र आक्षेप नोंदवत भाजपावर निशाणा साधला आहे. आम्हाला सिनेमा दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, असं सांगत महाराष्ट्र यूथ काँग्रेसकडून नोटिसही बजावण्यात आली आहे. जर असं झाले नाही तर देशभरात कोठेही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे. शिवाय, या सिनेमाविरोधात काँग्रेस न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.
या सिनेमावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये जुंपलेली असताना, दुसरीकडे, डॉ. मनमोहन सिंग यांनी मात्र सिनेमासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देणं टाळलं आहे.
(मोदींनी तर देशाचाच ऍक्सिडंट केला; 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या ट्रेलरवरून काँग्रेसचा टोला)
राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस पार्टीच्या स्थापना दिवसनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहिले होते. यावेळेस पत्रकारांनी त्यांना 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमासंदर्भात प्रश्न विचारले. मात्र यावर कोणतेही उत्तर देण्याऐवजी सिंग यांनी मौनच साधणं पसंत केले.
तर दुसरीकडे, हा सिनेमा म्हणजे भाजपाचा गेम असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार पीएल पुनिया यांनी केला आहे. भाजपाला सत्तेत राहून पाच वर्ष झाली मात्र जनतेला सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजपा अशा पद्धतीनं हातखंडे आजमावत आहे, असेही पुनिया यांनी म्हटले.
'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमात अभिनेते अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका अतिशय सक्षमपणे सांभाळल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे. तर अभिनेता अक्षय खन्नानं सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारुंची व्यक्तिरेखा साकारली आहे. संजय बारु मे २००४ ते ऑगस्ट २००८ या कालावधीत सिंग यांचे माध्यम सल्लागार आणि प्रमुख प्रवक्ते होते. त्यांनी लिहिलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावरुन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विजय गुट्टे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.