बंगळुरु : कर्नाटकमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत पाहयला मिळणार आहे, कारण कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. सध्या कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपुष्टात येत आहे. 225 सदस्यांच्या विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीने अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2013 मधील निवडणुकीपेक्षा चार जागा कॉंग्रेसला जास्त मिळतील. म्हणजेच आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला 126 जागा मिळतील. याचबरोबर, भाजपाला या सर्व्हेनुसार 70 जागा मिळतील अशी शक्यता वर्तविली आहे. विशेष म्हणजे गेल्या सर्व्हेच्या तुलनेत भाजपाला 30 जागा जास्त मिळतील, तर जेडीएसला फक्त 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा सर्व्हे 154 जागांसाठी जवळपास सर्व जिल्ह्यातून आणि 22, 357 लोकांमधून केला आहे. याआधी सुद्धा अशाप्रकारचा सर्व्हे कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तन यात्रेनंतर राहुल गांधी यांच्या दौ-याआधी सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी कॉंग्रेसला 105 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यावेळी कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी 113 जागांची गरज असताना सर्व्हेनुसार आठ जागा कमी दाखविण्यात आल्या होत्या. तसेच, भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बी एस येदियुरप्पा यांच्यापेक्षा कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जास्त लोकप्रिय असल्याचेही या सर्व्हेत म्हटले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 19 टक्क्यांचे अंतर दिसून येत आहे.
काँग्रेसच्या सर्व्हेनुसार कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 9:35 AM