नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. योगी आदित्यनाथ हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते, उद्योगपती, संत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच दरम्यान शपथविधीसाठी आजचाच दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्योतिषांच्या मते, शपथविधीसाठी 25 मार्च ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. 14 मार्चपासून सूर्य ग्रह मीन राशीत असल्याने खरमास सुरू आहे. हा खरमास 14 एप्रिलपर्यंत राहील.
खरमासमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. यादरम्यान घराचं बांधकाम, विवाह असे कोणतेही संस्कार कार्य करत नाही अशी मान्यता आहे. पण या सर्व प्रतिकूल योगांमध्ये एक शुभ योगही तयार होत आहे. 24 मार्च रोजी बुध मीन राशीत आल्याने बुधादित्य योग तयार झाला आहे. याला ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हणून संबोधलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि सूर्याचा संयोग बुद्धिमत्ता आणि कौशल्याने सत्ता चालवण्याचे शक्ति प्रदान करतो. खरमास असूनही हा योग शुभ मानला गेला आहे. तर होळीपूर्वी शपथ न घेण्यामागे होलाष्टक असण्याचे कारण सांगण्यात आलं होतं.
"हा काळ योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ"
नक्षत्राबद्दल बोलायचे झाले तर, 25 तारखेला नक्षत्र खूप चांगले आहे आणि या दिवशी स्थिर योग तयार होत आहे. ज्या दरम्यान केलेले कोणतेही काम स्थिर असते, अशी मान्यता आहे. या दिवशी मूळ नक्षत्र अष्टमी तिथी आहे ज्याला शीतला अष्टमी असेही म्हणतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, अशा वेळी जे काम हाती घेतलं जातं, त्यात कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे 25 तारखेला योगी आदित्यनाथ आपल्या मंत्रिमंडळासह शपथ घेणार आहेत. 2024 मध्ये केतूच्या महादशानंतर शुक्राची महादशा सुरू होणार आहे. हा काळ योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात, हे फक्त त्यांच्याच हातात"
योगींच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. शपथविधीच्या आधी योगी आदित्यनाथांच्या बहिणीने इच्छा व्यक्त केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात" असं योगींच्या बहिणीने म्हटलं आहे. तसेच योगींच्या मेहुण्याने त्यांचा एक किस्सा देखील सांगितला आहे. योगी आदित्यनाथ यांची बहीण आणि त्यांचे मेहुणे योगींच्या शपथविधीच्या विषयावर 'टाइम्स नाऊ नवभारत' वाहिनीशी बोलत होते. याच दरम्यान पत्रकाराने त्यांची बहीण शशी सिंह यांना योगी आदित्यनाथ यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात प्रश्न केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर तेही पंतप्रधान होऊ शकतात. हे सर्व फक्त मोदींच्या हातात आहे, असंही म्हटलं आहे.