नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आरटी-पीसीआर, अँटिजन टेस्टसह ‘फेलुदा’ पेपर टेस्टला परवानगी दिली आहे. आयसीएमआरकडून यासंबंधी नियमावली जारी करण्यात आली आहे.
तात्काळ, तसेच अचून निदान स्पष्ट करणारी ही तपासणी आहे. आता नागरिकांना कोरोनासंबंधीच्या अहवालाची फार काळ वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या तासाभरात कोरोनासंसर्गाचे निदान होईल. देशात सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट वापरली जाते. अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर ती ग्राह्य आहे; परंतु कोरोना लक्षणे असलेल्यांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह असल्यास खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्याला मात्र किमान २४ तास वाट पाहावी लागते. आता फेलुदा टेस्टमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
फेलुदा पेपर स्ट्रीप टेस्ट म्हणजे काय?- फेलुदा पेपर स्ट्रीप टेस्टमध्ये सीआरआयएसपीआर-कॅस ९ तंत्रज्ञानाने कोरोना संसर्गासंबंधी माहिती तासाभरात मिळते. कुठल्याही प्रकारचा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. - फेलुदा टेस्टच्या अहवालानंतर कोरोनाची फेर पडताळणी करण्यासाठी आरटीपीसीआर तपासणी करण्याची गरज पडत नाही, असा दावा करण्यात आला आहे.- तपासणीतील पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अहवाल हे स्पष्ट असतात. भारताच्या औषध महानियंत्रकांनी या तपासणीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर ही नियमावली तयार करण्यात आली आहे.
आयसीएमआरची नियमावली - कोरोनाच्या निदानासाठी फेलुदा पेपर स्ट्रीप टेस्टचा वापर सुरक्षित आहे. - तपासणीतील पॉझिटिव्ह, तसच निगेटिव्ह अहवाल विश्वासार्ह आहेत. - कोरोना तपासणी करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये फेलुदा तपासणी केली जाईल. - तपासणीसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.- आरटीपीसीआर, सीआरआयएसपीआर, ट्युनेट, सीबीनॅटसाठी दिले जाणारे कोणेतेही प्रिस्क्रिब्शन सारखेच असेल. - टेस्टच्या प्रकारानुसार संपूर्ण माहिती आयसीएमआरच्या कोरोनासंबंधित वेब पोर्टलवर अपलोड केली जाईल.