नवी दिल्ली : विशेष न्यायालयाने बुधवारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि अन्य तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवजांचा वापर आणि कटाबद्दल आरोप निश्चित केले. छोटा राजनला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आल्यानंतर त्याने निर्दोष असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर, विशेष न्यायाधीश विनोद कुमार यांनी आरोपाच्या निश्चितीसंबंधी आदेश दिला.राजनने आरोपी असलेल्या जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल शाह आणि ललिता लक्ष्मणन या तीन सरकारी अधिकाऱ्यांच्या (सध्या निवृत्त) मदतीने मोहनकुमार याच्या नावे बनावट पासपोर्ट मिळविला होता. राजन अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे या प्रकरणी ११ जुलैपासून दैनंदिन आधारावर सुनावणी करण्याचा आदेशही न्यायाधीशांनी दिला आहे.या सर्वांवर कलम ४२० (फसवणूक), ४७१ (बनावट दस्तऐवज अस्सल दाखविणे), ४६८ ( फसवणुकीच्या उद्देशाने दस्तऐवजांचा वापर), ४१९ (दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर फसवणूक), १२० बी( गुन्हेगारी कट), तसेच पासपोर्ट कायद्याच्या कलम १२ नुसार, तसेच सदर तीन निवृत्त अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये आरोप निश्चित करण्यात आले.
राजनविरुद्ध आरोप निश्चित
By admin | Published: June 09, 2016 5:31 AM