नवी दिल्ली : आणीबाणी म्हणजे भारतासाठी सर्वाधिक अंधकारमय युग होते, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केली. सत्तेच्या लालसेपोटी ४० वर्षांपूर्वी तत्कालीन राजकीय नेतृत्वाकडून भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला. देशाला साखळदंडात जखडून त्याचे रूपांतर कारागृहात करण्यात आले होते, अशा तीव्र शब्दांत त्यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले.देशात आणीबाणी लागू करण्याला गुरुवारी ४० वर्षे पूर्ण झाली. एक जिवंत आणि उदार लोकशाही म्हणजे प्रगतीची किल्ली असून, लोकशाही विचार व आदर्शांच्या बळकटीकरिता सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भावना पंतप्रधानांनी टिष्ट्वटद्वारे व्यक्त केली आहे. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती आणि २१ मार्च १९७७ पर्यंत ती लागू होती. आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले; परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला लाखो लोकांनी विरोध केला होता, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आणीबाणीच्या चाळीशीला आरोप-प्रत्त्यारोप
By admin | Published: June 26, 2015 12:03 AM