Amit Shah On Rahul Gandhi ( Marathi News ) : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचे तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. या खंडणी रॅकेटच्या माध्यमातून भाजप पैसे गोळा करत असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या आरोपांना आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती. आता राजकारणात पुन्हा काळा पैसा येण्याचा धोका आहे, असंही अमित शाह म्हणाले.
राहुल गांधींवर पलटवार करताना अमित शाह यांनी म्हटलं आहे की, "कॅशच्या माध्यमातून जो निधी राजकीय पक्षांना मिळत होता, त्यामध्ये आजपर्यंत कोणाचं नाव जाहीर झालंय का? कोणाचंच नाही झालं. मात्र जे राजकीय आरोप आहेत, त्यांना मला सविस्तर उत्तर द्यायचं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला खूप मोठा फायदा झाला आहे, कारण भाजप सत्तेत आहे, असा अजेंडा चालवला जात आहे. निवडणूक रोखे हे जगातील सगळ्यातं मोठं खंडणी रॅकेट असल्याचं वक्तव्य आज राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यांना कोण असं लिहून देतं, माहीत नाही. मी देशाच्या जनेतसमोर आज चित्र स्पष्ट करू इच्छितो. भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ६ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या एकूण निधीचा आकडा २० हजार कोटी रुपये इतका आहे. मग उरलेले १४ हजार कोटी रुपये कुठे गेले? तृणमूल काँग्रेसला १६०० कोटी रुपये मिळाले, काँग्रेसला १४०० कोटी रुपये मिळाले आहेत," असा दावा अमित शाह यांनी केला आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.
काय आहे राहुल गांधींचा आरोप?
भाजपवर घणाघाती आरोप करताना आज भिवंडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, "मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट. ईडी-सीबीआय तपास करत नाहीत, ते भाजपसाठी वसुली करतात. या पैशांचा वापर देशातील पक्ष फोडण्यासाठी होतो. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे," असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.
दरम्यान, "सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सार्वजनिक करावा. त्यानंतर देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही. भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून कंपन्यांकडून पैसे उकळते. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली जाते, त्या कंपन्या भाजपला देणगी देतात. संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचारात ढकलण्यासारखे आहे. ही पंतप्रधान मोदींची आयडिया आहे. हे नितीन गडकरींनी नाही, तर पंतप्रधान मोदींनी केलं आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.