अभिनेता शाहरुख खान याचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी, जबलपूरमधून आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 02:31 PM2022-01-09T14:31:24+5:302022-01-09T14:38:47+5:30
महाराष्ट्र पोलिसांना बनावट कॉल करणाऱ्या आरोपी जितेश ठाकूरला जबलपूर येथील संजीवनी नगर पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. जितेश ठाकूरने 6 तारखेला महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन शाहरुख खानच्या बंगल्यासह मुंबईतील महत्वाची ठिकाणे बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.
मुंबई/जबलपूर: अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील बंगला उडवून देण्याची आणि इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मध्य प्रदेशच्या जबलपूर पोलिसांनी अटक केली आहे. जबलपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन मुंबईतील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. संजीवनीनगर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, तरुणाने 6 तारखेला नियंत्रण कक्षात फोन करुन ही धमकी दिली होती.
अनेक ठिकाणी स्फोटाची धमकी
महाराष्ट्र पोलिसांना बनावट कॉल करणाऱ्या जितेश ठाकूर या आरोपीला जबलपूर येथील संजीवनी नगर पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. जितेश ठाकूर हा संजीवनी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगा नगर भागात राहतो. 6 जानेवारीला त्याने महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. यावेळी आरोपीने मुंबईतील शाहरुख खानचा बंगला आणि रेल्वे स्टेशनसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी दिली.
असा पकडला आरोपी
महाराष्ट्र पोलिसांनी कंट्रोल रुममध्ये आलेल्या आरोपी जितेश ठाकूरचा कॉल ट्रेस केला असता तो जबलपूरचा नंबर निघाला. यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी जबलपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जबलपूर पोलिस सतर्क झाले आणि आरोपी तरुणाला त्याच्या गंगानगर येथील घरातून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरुणाने यापूर्वी अनेकदा सीएम हेल्पलाइन आणि डायल हंड्रेडवर कॉल करून त्रास दिला आहे. दारू पिऊन तरुण मुख्यमंत्री हेल्पलाइन आणि 100 क्रमांकावर खोटा कॉल करतो. पोलिसांनी आरोपी तरुण जितेश ठाकूरला न्यायालयात हजर केले, त्यानंतर आरोपी जितेश ठाकूरवर कायदेशीर कारवाई केली जाईल.