पिलीभीत : अब्रूनुकसानीचा दावा मागे घेण्यासाठी बँक आॅफ बडोदाकडून धमक्या मिळत आहेत, असा आरोप फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या कर्जासाठी हमीदार बनविलेल्या शेतकऱ्याने केला आहे.मल्ल्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या कागदपत्रांवर हमीदार म्हणून पिलीभीत जिल्ह्यातील शेतकरी मनमोहनसिंग यांच्या नावाचा उल्लेख आहे. मल्ल्यांनी पैशांचा चुकारा न केल्याने बँकेने हमीदार म्हणून मनमोहनसिंग यांचे खाते गोठविले. काहीही संबंध नसताना आपले खाते गोठविल्याचे पाहून आठ एकर जमीन नावे असलेल्या सिंग यांना धक्काच बसला. बँकेच्या कारवाईमुळे सिंग यांना बँक व्यवहार करता येत नव्हते, तसेच सरकारी अनुदान मिळणेही शक्य नव्हते. आपण मल्ल्याला ओळखत नाही, असे सांगत त्यांनी ६ जून रोजी बँकेविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. दुसराच कोणी सिंग असल्याचे बँकेच्याही लक्षात आले; तोपर्यंत विषय न्यायालयात गेला. बँक आॅफ बडोदाविरुद्धचा अब्रूनुकसानीचा दावा मागे घे म्हणून अधिकारी १७ जून रोजी आपल्या घरी आले व तडजोड करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला, असे सिंग यांनी या अर्जात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
मल्ल्याच्या हमीदाराचा बँक अधिकाऱ्यावर आरोप
By admin | Published: June 26, 2016 2:20 AM