ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - दुहेरी हत्या प्रकरणातील आरोपीची उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात सुटका करण्यात आली होती. यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी न्यायालयाच्या त्याच खंडपीठाने टायपिंगमध्ये चूक झाल्याचं सांगत सुटका रद्द रद्द करण्याचा आदेश दिला. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला असून आता विशेष पथक आणि क्राईम ब्रांच त्याचा शोध घेत आहे.
जितेंद्र उर्फ कल्ला 16 वर्ष 10 महिन्यांपासून तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होता. 2003 रोजी त्याला शिक्षा सुनावताना सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 30 वर्ष आधी त्याच्या सुटकेचा विचारही केला जाऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर त्याच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान केलं होतं. सुनावण्यात आलेली शिक्षा खूप मोठी असून शिक्षेची वर्ष कमी करावीत अशी मागणी त्यांनी केली होती.
उच्च न्यायालयातील न्यायाधीश जीएस सिस्तानी आणि संगीता धिंगडा यांनी सुनावणी करत 24 डिसेंबर रोजी निर्णय दिला. निर्णयात त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला वाटतं न्यायासाठी 30 वर्षांची अट हटवणं गरजेचं आहे. यामुळे आम्ही शिक्षेचा कार्यकाळ याचिकाकर्त्यांने कारागृहात भोगलेल्या शिक्षेइतका म्हणजेच 16 वर्ष 10 महिने करत आहोत. याचिकाकर्त्यांला गुन्हेगार ठरवण्याचा निर्णय कायम ठेवत असून त्याच्या शिक्षेत बदल करत आहोत. जर दुस-या कोणत्या प्रकरणात गरज नसेल तर त्याची सुटका करण्यात यावी'. या निर्णयानंतर जितेंद्र उर्फ कल्लाची सुटका करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या त्याच खंडपीठाने 14 फेब्रुवारी रोजी नवा आदेश जारी करत आपल्या आदेशात टायपिंग चूक झाल्याचं सांगितलं. आदेशातील चूक सुधारत न्यायलायाने वाक्य डिलीट करत असल्याचं सांगितल. हे वाक्य होतं....'याचिकाकर्त्यांने कारागृहात भोगलेल्या शिक्षेइतका म्हणजेच 16 वर्ष 10 महिने ' आणि 'दुस-या कोणत्या प्रकरणात गरज नसेल तर त्याची सुटका करण्यात यावी'.
न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी जितेंद्र उर्फ कल्ला फरार झाला असून दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि क्राईम ब्रांच त्याचा शोध घेत आहे.