मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तरुणीसोबत झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच दरम्यान मौगंज परिसरात तरुणीसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलिसांनी गुन्हेगार पंकज त्रिपाठी याला अटक करून त्याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. यासोबतच पोलिसांनी आरोपी चालक पंकजचा परवानाही रद्द केला आहे. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीचे लोकेशन ट्रेस करून त्याला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अटक केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रीवा येथे आपल्या मैत्रिणीला बेदम मारहाण करणाऱ्या पंकज त्रिपाठीला पोलिसांनी यूपीमधून अटक केली आहे. या घटनेनंतर स्टेशन प्रभारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांनी बुलडोजर चालवून आरोपीचे घर उद्ध्वस्त केले आहे. रिवा पोलिसांनी आरोपी पंकज त्रिपाठीविरुद्ध अपहरण, प्राणघातक हल्ला आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?रीवा जिल्ह्यात एका तरुणीला तिच्या प्रियकराने बेदम मारहाण केली. तरुणी प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी करत होती. पण तिच्या वारंवार विचारणेमुळे संतापाच्या भरात प्रियकरानं तिला बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात खूप व्हायरल झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मुलीचं वय १९ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणीला करण्यात आलेली बेदम मारहाण पाहून सर्वांचेच हृदय पिळवटून निघालं होतं. प्रियकरानं तरुणीला इतक्या जोरात कानशिलात लगावली की ती थेट जमिनीवर कोसळली. तरीही नराधम थांबला नाही त्यानं तिच्या चेहऱ्यावर लाथा मारल्या याचा भयानक व्हिडिओ व्हायरल झाला.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान संतापलेसंबंधित घटेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संताप व्यक्त केला. तसंच महिलांविरोधातील अत्याचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. या ट्विटरमध्ये नराधमाच्या घरावर चालवण्यात आलेला बुलडोझरचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.