चिकोडी : तालुक्यातील हिरेकोडी येथील आचार्य प. पु. श्री कामकुमार नंदी महाराजाच्या हत्याप्रकरणातील आरोपींना आज चिकोडी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सुनावणीनंतर दोन्ही आरोपींना आज, सोमवारी हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले. आरोपी नारायण माळी व हसन ढालायत हे मागील सात दिवसापासून पोलिस कोठडीत होते. आरोपींची आज पोलिस कस्टडीची मुद्दत संपल्याने चिकोडी शहरातील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडीगेर यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायलायाने दोघांना पुढील २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींना कडक बंदोबस्तमध्ये बेळगांव हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले. यावेळी चिकोडी न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हिरेकोडी आश्रमाचे आचार्य प. पु. श्री कामकुमार नंदी महाराज बेपत्ता असल्याची तक्रार भक्तांनी केली होती. तपासादरम्यान आश्रमात कोण-कोण आले-गेले? याचा तपास करीत असताना पोलिसांनी स्वामीजींना ओळखणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आर्थिक व्यवहारातून स्वामींना आश्रमात मारून मृतदेह इतरत्र टाकल्याची माहिती दिली होती. आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या १५ वर्षांपासून नंदीपर्वत, हिरेकोडी येथील जैन बस्तीमध्ये राहत होते.
जैन मुनी हत्याप्रकरणातील आरोपींना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 5:22 PM