बंगळुरू : कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदुर्ग मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरघा शरानारू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठतीत असताना शिवमूर्ती यांच्या छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
काही तासांपूर्वी शिवमूर्ती यांच्यावर रुग्णलयातील आपत्कालीन वॉर्डात उपचार सुरू होते. तिथे डॉक्टरांच्या टीमने त्यांची ईसीजी, इको टेस्ट आणि चेस्ट स्कॅन केले. याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना चित्रदुर्ग रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांना चांगल्या उपचारासाठी जयदेव हॉस्पिटल किंवा बंगळुरूच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवले जाऊ शकते, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दोन अल्पवयीन मुलींनी शिवमूर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी शिवमूर्ती यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवमूर्ती यांना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक करण्यात आली होती. याआधी शिवमूर्ती यांच्याविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. दोन अल्पवयीन मुलींनी शिवमूर्ती यांच्याविरोधात म्हैसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवमूर्ती यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
चित्रदुर्ग मठ संचालित एका शाळेतील दोन मुलींनी १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ यादरम्यान शिवमूर्ती यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांकडून शिवमूर्ती यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हे आपल्याविरोधात रचण्यात आलेले कटकारस्थान आहे. या प्रकरणात लवकरच निर्दोष मुक्तता होईल, असे विधान शिवमूर्ती यांनी केले आहे.